भातुकली

लहानपणी मी आणि संजीवनी भातुकलीच्या खेळात फार रमत असू. थोडेसे भाजके दाणे आणि एक गुळाचा खडा एवढे आम्हाला खेळण्यासाठी पुरत असे. बाकी मग छोट्या कपबशीतून आम्ही खोटा खोटा चहा पीत असू. छोट्याशा चुलीवर पितळेच्या कुकरमध्ये भात लावत असू. दाणे आणि गूळ एकत्र करून त्याचे लाडू तयार करीत असून. मग स्वयंपाक झाल्यावर बाहेर जाऊन येत असू. असा हा आमचा खेळ जवळजवळ दुपारभर चालत असे काही आरडाओरडा नाही, भांडणे नाहीत. त्यामुळे आया देखील आम्हाला भातुकली खेळायला नाही म्हणत नसत. पुढे आम्ही मोठ्या झालो. आमच्या बालपणाबरोबरच भातुलकली मागे पडली. काळ खूपच पुढे गेला. संजीवनी आणि मी आम्हा दोघींचेही संसार सुरू झाले.

परंतु आमची मैत्री आणि सख्य मात्र कायम राहीलं. हक्काने एकमेकींच्या घरी जाणे येणे, कौटुंबिक कार्यक्रमांना भेटणे चालूच राहिले. संजीवनीच्या घरी तिच्या दोन नाती होत्या. त्यांना मीच आमची आठवण म्हणून वाढदिवसाला भातुकलीचा खेळ दिला होता. त्यांना तो फार आवडे. कालानुरूप त्यात खूप बदल झाले होते.

एकदा काही निमित्ताने संजीवनीच्या घरी जेवणाचा योग आला. मी सकाळी लवकरच गेले आणि दिवसभर थांबण्याचाही विचार पक्का केला. आज खूप मनसोक्त गप्पा मारण्याचा आमच्या दोघींचा विचार होता. ठरल्याप्रमाणे जेवणे छान झाली. थोड्या वेळात तिच्या दोनही नाती शाळेतून घरी आल्या. त्यांचीही जेवणे झाल्यावर आम्ही दोघी हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. तेवढ्यात तिला तिच्या नणंदेचा फोन आला म्हणून संजीवनी आत गेली. दोघी नाती हळूहळू मोकळ्या होत माझ्याशी बोलू लागल्या नंतर तिथेच एका कोपऱ्यात त्यांनी भातुकलीचा डाव मांडला आणि त्या त्यात रमल्या. मी बघत होते. मला माझे लहानपण आठवले. मला त्यांच्याऐवजी मी आणि संजीवनीच ओसरीवर डाव मांडून बसलेल्या दिसू लागलो. मी पण त्यांच्या खेळात रस घेऊ लागले.

पण मला गंमत वाटली, काळ बदलला होता. जवळ जवळ 50 वर्षे सरली होती. संकल्पना, सुखसोयी, स्वयंपाकघराच्या जडणघडणीत आणि म्हणूनच भातुकलीतही आमूलाग्र बदल झाला होता. त्यांचे अत्याधुनिक किचन सर्व सुखसोयींनी युक्त होते. पण आता खेळातसुद्धा त्या संध्याकाळसाठी पिझ्झा ऑर्डर करीत होत्या. मोबाइलवर एकमेकींना मेसेज करून बोलावत होत्या. एटीएममधून पैसे काढत होत्या. त्यांच्या बार्बीला बेबी सीटरकडे ठेवत होत्या. हातात लॅपटॉपची बॅग, पर्स घेऊन गाडीची किल्ली हातात हलवत ऑफिसमध्ये जात होत्या. जाताना कामवाल्या बाईंना स्वयंपाकाच्या सूचना देत होत्या. मोठी नात आई झाली होती, ती धाकटीला सांगत होती बाबाचा यूएसवरून फोन येईल. तो कॉन्फरन्स कॉलवर टाक, म्हणजे मला पण ऑफिसमधून बोलता येईल व आपली तिघांची फोनवर भेट होईल. वगैरे वगैरे त्या दोघी मनापासून खेळात रमल्या होत्या. मी तिथे आहे, हे ही त्या विसरल्या होत्या. पण मी आणि माझे मन मात्र भूतकाळात गेले होते.

एवढ्यात संजीवनी बाहेर येत म्हणाली, पाहिलीत ना यांची भातुकली. किती रमतात ना त्या या खेळात. आपण दोघी खेळायचो तशाच! खेळ तोच, पण खेळगडी आणि काळ बदललेला! पुढे आणि नेहमी पुढेच जाणारा…

– आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.