भाष्य : (संदीप घिसे) शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार आहेत तर पिंपरीचा आपला बाल्लेकिल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2019 साली पुन्हा मिळविला. सुरुवातीपासूनच भाजपचे पिंपरी विधानसभेकडे दुर्लक्ष राहिले आहे. आता तर पिंपरी विधानसभा या मतदारसंघातील महापालिकेचे प्रभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसला भेट दिल्याप्रमाणे भाजप पिंपरीकडे दुर्लक्ष करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदार संघ येतात. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रांचा समावेश मावळ लोकसभा मतदार संघात आणि भोसरी विधानसभा क्षेत्र शिरूर लोकसभा मतदार संघात येतात. शहरात भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे आहेत. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आहेत. अण्णा बनसोडे हे पिंपरीचे आमदार आहेत. भाजपने उमा खापरे यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने शहराला भाजपचा तिसरा आमदार मिळाला आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आहे. मात्र त्यांचे सर्वाधिक लक्ष हे भोसरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांवर आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी चिंचवडमधील विकासकामांमध्ये लक्ष घातले आहे. मात्र भाजपच्या पिंपरीतील कार्यकर्त्यांना कोणी वाली उरला नसल्याने मागील पंचवार्षिकमध्ये दिसून आले आहे. भाजपची महापालिकेवर सत्ता असताना पिंपरी विधानसभा मतदार संघातील एकाही नगरसेवकाला महापौर किंवा स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले नाही. केवळ उपमहापौर पदावर येथील नगरसेवकांची बोळवण केली. आजही पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांची कामे होत नाही. मात्र याबाबत कैफियत कोणाकडे मांडायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आपण पिंपरी विधानसभा क्षेत्रात लक्ष घालू असे अनेकदा सांगितले होते. मात्र त्यांनी वरवर लक्ष घातल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी ही जागा शिवसेनेकडे होती. पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी भाजपला आरपीआयच्या आठवले गटाची साथ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरीतून भाजपचे अनेकजण इच्छुक आहेत. मात्र उमेदवारीची खात्री नसल्याने ते देखील मैदानात उतरलेले नाही. एकूणच काय तर आगामी विधानसभा निवडणूकीपर्यंत येथील भाजप कार्यकर्त्यांचा वनवास संपणार नाही, हेच खरे. मात्र सध्यातरी भाजपने हा मतदार संघ राष्ट्रवादीला आंदण दिल्यासारखेच चित्र आहे.