संयुक्तराष्ट्रे : पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेर्रेस हेच काश्मीर प्रश्नावरील चर्चा उपस्थित करण्याची संधी साधण्याची शक्यता आहे.
गुटेर्रेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजार्रिक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काश्मीरचा विषय चर्चेने सोडवला पाहिजे अशी त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. काश्मीरातील सध्याच्या स्थितीत मानवाधिकाराचे रक्षण ही महत्वाची बाब असून त्याकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
सरचिटणीस काश्मीरच्या विषयावर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत असेही त्यांनी नमूद केले. या विषयावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपसात चर्चा करून तोडगा काढला पाहिजे पण त्यात त्यांना काही अडचण येत असेल तर संयुक्तराष्ट्रांचे व्यासपीठ त्यांना उपलब्ध आहे त्याचाही त्यांनी वापर करून घेतला पाहिजे असेही त्यांचे म्हणणे असलेल्याचे दुजार्रिक यांनी सांगितले. पाकिस्तानी बाजूकडूनही या आमसभेत काश्मीरचा विषय उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.