शिरवळ – शिरवळ, ता. खंडाळा येथून काही अंतरावर असलेल्या धनगरवाडी हद्दीतील मोटे वस्तीजवळ त्याच गावातील दोन गटांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष मयूर कृष्णा शिवतरे (वय 29) यांचा तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी खंडाळा पंचायत समितीचा सभापती मकरंद मोटे याच्यासह पाच ते सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या मारामारीप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. मोटे व त्याच्या सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत धनगरवाडी, ता. खंडाळा येथे मोटे वस्ती आहे. तेथे खंडाळा पंचायत समितीचा सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे कुटुंबीयासह वास्तव्यास आहे. मकरंद मोटे याचा मुलगा अनिकेत व मयूर शिवतरे यांच्यात सोमवारी (दि. 25) दूरध्वनीवरून शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर मयूर शिवतरे हे काही लोकांसमवेत रात्री दहाच्या सुमारास मोटे वस्तीत गेले.
फोनवरून झालेल्या शाब्दिक चकमकीबद्दल त्यांनी जाब विचारला असता, दोन गटांमध्ये वादावादी झाली. थोड्याच वेळात वादावादीचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले. त्यावेळी झालेल्या तुंबळ मारामारीत तलवारीसह घातक शस्त्रांचा वापर झाला. यात मयूर शिवतरे यांच्यावर तलवारीने सहा ते सात वार झाले.
त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेत विरोधी गटाचे रवी मोटे व योगेश मोटे हेदेखील गंभीर जखमी झाले. मयूर शिवतरे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रवी व योगेश मोटे यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सभापती मकरंद मोटेसह पाच ते सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी रवींद्र आनंदा मोटे (वय 29) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चुलत भाऊ केतन मारुती मोटे याने मला फोन करून सांगितले की, केतन व अमित मोटे हे आभा सोसायटीजवळून ट्रॅक्टर घेऊन जात असताना रस्त्याकडेला मयूर शिवतरे, प्रवीण शिवतरे, बंटी कदम, योगेश शिवतरे व अविनाश यांनी ट्रॅक्टर थांबवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबद्दल शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर रात्री मयूर शिवतरे, वैभव शिवतरे, प्रवीण शिवतरे, बंटी कदम, योगेश शिवतरे, अविनाश व इतर चार-पाच जण कारमधून वस्तीवर आले. योगेश शिवतरेच्या हातात तलवार तर वैभव शिवतरेच्या हातात कोयता होता. बाकीच्या लोकांच्या हातात लोखंडी सळया, काठ्या होत्या, म्हणून आम्ही घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी बाहेर झोपलेला चुलत भाऊ मयूर रमेश मोटे याला मारहाण झाल्याचा आवाज आला.
त्यामुळे मी घराच्या पाठीमागील दाराने बाहेर येऊन पाहिले असता ते दहा ते अकरा जण मयूरला मारहाण करत असल्याचे दिसले. मी मयूरला वाचविण्याचा प्रयत्न केला असता मयूर शिवतरे व वैभव शिवतरे यांनी मला तलवार व कोयत्याने मारहाण केली. मी पळून जात असताना वैभवने माझ्या डोक्यावर मागील बाजूस कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला व मयूर मोटेला मारहाण होत असताना माझी पत्नी कोमल, आई चतुरा, भावजय अनिता, चुलती छाया या बाहेर आल्या. त्यांनी दोघांना मारू नका, अशी विनवणी केली असता असताना घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी योगेश शिवतरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मयूर शिवतरे, प्रवीण शिवतरे, बंटी कदम यांच्यासमवेत मी धनगरवाडी ग्रामपंचायतीसमोर थांबलो होतो. त्यावेळी मयूर शिवतरे यांनी सांगितले की, मकरंद मोटे यांचा मुलगा अनिकेतचा फोन आला होता. त्याने फोनवरून शिवीगाळ केली. त्याबद्दल अनिकेतला विचारणा करण्यासाठी मी मोटे वस्तीवर गेलो. योगेश, मयूर हे बुलेटवरून आणि प्रवीण शिवतरे व बंटी कदम हे मोटारसायकलवरून मोटे वस्तीवर पोहोचले.
त्यावेळी अनिकेत, मकरंद मोटे, रवी मोटे, केतन मोटे, रमेश मोटे हे तेथे उभे होते. मला शिव्या का दिल्या, असे मयूर शिवतरेने अनिकेतला विचारले असता, मकरंद मोटे यांनी मयूरच्या कानाखाली मारली. अनिकेत मोटेने त्याच्या हातातील तलवारीने मयूरच्या तोंडावर, गालावर, मानेवर व उजव्या हातावर तलवारीने सपासप वार केले. रवी मोटे व रमेश मोटे यांनी मयूरला पाठीमागून पकडले.
योगेश व मयूर यास मकरंद मोटे यांनी डोक्यात व मयूरच्या पाठीवर लोखंडी बारने मारहाण केली. आम्ही खाली पडल्यावर केतन मोटेने आम्हाला लाथा मारल्या. मयूर शिवतरेला अनिकेत व मकरंद मोटे यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मयूर शिवतरेचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमेश हजारे तपास करत आहेत. पोलिसांनी संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता मकरंद मोटे यास दहा दिवसांची तर इतर संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.