राहाता – मुखी हरीनामाचा जयघोष …आणि लाडक्या विठुरायांची मनी आस असलेल्या भक्तांचा महामेळा अर्थात निवृत्तीनाथ पायी दिंडीचे शनिवारी सकाळी लोणीत आगमन झाले अन् अवघी सहकार पंढरी भक्तीमय झाली. मजल दरमजल करत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून पंढरपूरकडे निघालेल्या विठुरायाच्या दिंडीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने लोणी येथील श्री राम मंदिर या ठिकाणी भक्तीमय वातावरण स्वागत करण्यात आले.
जवळपास 20 ते 25 हजार भाविकांचा लवाजमासोबत विठ्ठलाचे भजन… टाळ मृदुंग गजर …कपाळी केशरी गंध …देवा तुझा मला छंद…भगवी पताका असा हा भक्तीचा सागर सकाळी दाखल झाला आणि हरीनामाने भक्तीमय झाला. गोगलगाव मुक्कामी असणारी ही दिंडी सकाळी लोणीत येताच लोणी खुर्द, लोणी बुद्रुक आणि बाभळेश्वर येथे भाविकांची सेवा करताना “हम सब एक है’ ची प्रचिती भाविकांनी दिली. माऊली चहा घ्या.. माऊली फराळ घ्या…नाष्टा करा अशी विनंती यानिमित्ताने तरुणाईसह भजनी मंडळ करत होते.
लोणी पोलिसांसह सर्वच जण आज या भक्तीसागरांत तन मन धनाने सहभागी झाले होते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडीत वारकऱ्यांची दुसरी अन् तिसरी पिढीचा सहभाग आहे. आज ही दिंडी राजुरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. पालखीचे सोहळ्याचे अध्यक्ष निलेश महाराज गाढवे, पालखी मानकरी मोहन महाराज बेलापूरचर, बाळकृष्ण महाराज टावरे, जयंत महाराज गोसावी, सोपान महाराज जतमालकर, नारायण काका मुढाल, राहुल महाराज सांळुखे, नवनाथ महाराज गांगुर्डे आदींसह हजारो भाविक सहभागी झाले आहे.