पुणे – महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ सोहळा येत्या बुधवारी (दि. 22 मार्च) रोजी पुण्यात होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ऋषीहुड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि लेखिका मृदुला भाटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
याबरोबरच गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे कुलगुरू, लेखक आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.अजित रानडे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत. संस्थेच्या अध्यक्षा सीए डॉ.रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुख्य सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या बनलेल्या आयरिश वंशाच्या मार्गारेट नोबल या युवतीने भारतात मानवसेवेचे त्यातही महिलांच्या उन्नतीसाठी मोठे काम केले. त्यांचे नामकरण भगिनी निवेदिता असे ठेवले गेले होते. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ 24 मार्च 1974 रोजी प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट विवेक दाढे व त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई दाढे यांनी या बॅंकेची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदापासून सुरु होत आहे. संपूर्ण महिलांनी चालवलेली ही बॅंक हे या बॅंकेचे वैशिष्ट्य आहे.
1974 मध्ये सव्वा दोन लाख रुपयांच्या ठेवींनी 2022 सालापर्यंत तब्बल 918 कोटींचा आकडा गाठला. 1974 च्या 3.5 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम 2022 पर्यंत 514 कोटींवर पोहोचली आहे. तर सातत्याने 18 वर्षे बॅंकेने 15 % लाभांश दिला आहे. आज पुणे व सातारा जिल्ह्यात मिळून बॅंकेच्या 18 शाखा कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारांनी बॅंकेला सन्मानित करण्यात आले आहे.