पिरंगुट – येथे आझादीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
येथील संस्कार स्कूलच्या वतीने महिला बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे व ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता पूजन करून ही रॅली मार्गस्थ झाली. पिरंगुट येथून निघालेल्या या रॅलीचे पौड येथे सांगता झाली. या रॅलीत विद्यालयातील जवळपास 60 महिला सहभागी झाल्या होत्या.
शाळेचे अध्यक्ष शिवाजी साठे व प्राचार्य स्नेहा साठे यांच्या हस्ते महिला सबलीकरण संबंधी तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना निवेदन देण्यात आले.प्राचार्या स्नेहा साठे म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेच्या वतीने 75 हजार बियांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी 75 जोर बैठका मारणे व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 275 फूट भव्य तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये 150 नागरिक सहभागी झाले होते. यानिमित्त पिरंगुट इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सैनिक परेडने पदयात्रेत रंगत आणली. यावेळी माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, माजी उपसरपंच रामदास पवळे, माजी उपसरपंच राहुल पवळे, माजी उपसरपंच प्रवीण कुंभार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह पांडुरंग चव्हाण, अविनाश पवळे, ओंकार जामदार, सुरज मारणे, अनिरुद्ध पाटील, विनायक सणस आदी सहभागी झाले होते.