प्रशासनाचा दावा : दि. 15 मेनंतर बाधितांचा आकडा कमी होणार
पुणे – शहरातील करोना बाधितांची संख्या अवघ्या 10 चौ.कि.मी. परिसरात वाढत आहे. या परिसरातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात शहरातील बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दि.15 मे नंतर रुग्णांची संख्या कमी होईल. नागरिकांनी अधिकाअधिक काळजी घेतल्यास करोनाची साथ लवकर आटोक्यात येण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्य तपासण्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या यातून करोनाचे रुग्ण पुढे येत आहेत. विलगीकरण कक्षात संशयित म्हणून ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीनंतरही बाधित सापडत आहेत. तसेच अन्य उपचारांसाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या स्वॅब टेस्टिंगमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. झोपडपट्टयांमध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या स्टाफ कडूनही संक्रमण झाल्याचे ताडीवाला रोड येथील बाधितांमधून समोर आले आहे.
महापालिकेच्यावतीने झोपडपट्टयांमधील स्वच्छतागृहांची दिवसांतून चार वेळा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे. सध्या महापालिकेच्या क्षेत्रात शासकिय आणि खासगी लॅबच्या माध्यमांतून सुमारे 700 नागरिकांची टेस्ट घेण्यात येत आहे. आणखी दोन खासगी लॅब कार्यन्वित होत असून, येत्या दोन दिवसांत दररोज एक हजार टेस्ट घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेविषयी जनजागृती सोबतच त्यांना मास्क व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.