मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून व्हिडिओ बनविले जात आहेत. त्या आधारे विविध नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या बाबी समोर येत आहे. आता बीसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांचा डीप फेक पद्धतीने केलेला एक व्हिडिओ जारी केला जात असून यात चौहान विशिष्ट शेअर खरेदी करण्याबाबत शिफारस करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा खोटा व्हिडिओ असून अशा प्रकारच्या व्हिडिओपासून गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने पुन्हा स्पष्ट केले आहे. (Beware of Deepfake Videos; Stock market advice to investors)
या संदर्भात राष्ट्रीय शेअर बाजाराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून चौहाण यांचा आवाज, चेहरा त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा लोगो वापरून काहीजण व्हिडिओ तयार करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून विशिष्ट शेअर खरेदी करावे असे सुचवत आहेत. असे करणे अयोग्य आहे. या संदर्भात योग्य पातळीवर राष्ट्रीय शेअर बाजार चौकशी करीत आहे.
ज्या व्यासपीठावरून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे त्या व्यासपीठांना राष्ट्रीय शेअर बाजाराने हे व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल असेही राष्ट्रीय शेअर बाजाराने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारासंदर्भातील कुठलीही माहिती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया हँडलवरूनच दिली जाते. त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून राष्ट्रीय शेअर बाजार अशा प्रकारची कसलीही माहिती जारी करत नसतो. जा गुंतवणूकदारांनी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले आहेत त्यांनी या संदर्भातील माहिती राष्ट्रीय शेअर बाजारांना कळविणे अपेक्षित आहे.
सल्ला देण्याचा अधिकार नाही
हे व्हिडिओ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चौहाण यांच्या आवाजाचा आणि चेहर्याचा वापर करून तयार केले असल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या सल्ल्याला बळी पडून गुंतवणूकदारानी गुंतवणूक करू नये आणि स्वतःचे नुकसान करून घेऊ नये असे आवाहन राष्ट्रीय शेअर बाजाराकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक किंवा इतर कोणत्याही कर्मचार्याला अशा प्रकारचा शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देण्याचा कसलाही अधिकार नाही ही बाब गुंतवणूकदारांना माहीत असणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले.