मध्य प्रदेश – जर तुम्ही सुद्दा ब्लूटूथ स्पीकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यात ब्लूटूथ स्पीकरच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक् घटना घडली आहे. जखमी मुलगा 13 वर्षांचा असून या दुर्घटनेत त्याच्या हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
देवेंद्र कुशवाह असे या मुलाचे नाव आहे. तो खजुराहोच्या लाल पूरवा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. 13 वर्षांचा मुलगा ब्लूटूथ स्पीकरवर गाणी ऐकत होता. त्याचवेळी स्पीकरमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला आणि मोठा आवाज झाला. या अपघातत देवेंद्रचे हात आणि चेहरा देखील भाजला आहे. अपघातानंतर मुलाला गंभीर अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. सध्या रुग्णालयात देवेंद्रवर उपचार असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर देवेंद्रसह त्याचे कुटुंबीय देखील घाबरले आहेत.