इस्रायलमधील निवडणूकीत बेंजामिन नेतान्याहू विजयी 

पाचव्यांदा बनणार पंतप्रधान

जेरुसलेम (इस्रायल) – इस्रायलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांना निर्विवाद विजय मिळाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून नेत्यान्याहू यांची पाचव्यावेळेस निवड होणार हे आता निश्‍चित झाले आहे. उजव्या विचारसरणीच्या लिकूड आणि अन्य राष्ट्रवादी, धार्मिक पक्षांना या निवडणूकीमध्ये बहुमत मिळाले आहे.

आतापर्यंतच्या राजकारणाचा कल पाहता इस्रायलच्या संसदेमध्ये उजव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या राजकीय पक्षांना बहुमत मिळाल्याचे इतिहासावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादावर चर्चेतून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना नेहमीच अटकाव झाला आहे. नेत्यान्याहू यांची पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यामुळे त्यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिकच बळकट झाले आहे. नेत्यान्याहू यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप गेल्या काही काळापासून झाले होते.

जाहीर झालेल्या निकालांनुसार लिकूड आणि त्यांच्या पारंपारिक मित्र पक्षांना मिळून संसदेमध्ये 65 -55 असे बहुमत मिळाले आहे. किरकोळ 1-2 पक्षांचे बळही त्यांना मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील संसदेमध्ये नेत्यान्याहू यांना बहुमत मिळणार हे निश्‍चित झाले आहे. संसदेतील अंतिम संख्याबळ उद्या स्पष्ट होणार आहे. नेत्यान्याहू यांचे एकेकाळचे सहकारी संरक्षण मंत्री अविग्दोर लायबरमॅन आणि अर्थमंत्री मोशे काहलोन यांचा नवीन मंत्रिमंडळातील सहभाग अद्याप निश्‍चित नाही. नेत्यान्याहू यांच्याकडून तशी औपचारिक घोषणाही झालेली नाही. आगामी आठवड्याभरामध्ये राजकीय वाटाघाटींना वेग येणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नेत्यान्याहू हेच “बिग विनर’ असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.