मुंबई – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर व उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने सन 2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यासर्व उमेदवाराचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर खंडित झाले होते, तेथून पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष×ऍड. अनिल परब यांनी दिली आहे.
यासंदर्भातील परिपत्रकसंबंधित विभागांना माधव काळे (महाव्यवस्थापक कर्मचारी वर्ग) यांनी जारी केले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीसंपूर्ण भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशा वेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने सन 2016-17 व 2019अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये 2846 पुरुष, चालक तथा वाहक, 161 महिला, चालक तथा वाहक, 2 पर्यवेक्षक व 107 अधिकाऱ्याचा समावेश होता.
सध्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी / अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते. त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या यानिर्णयाचे स्वागतप्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.