२००१ पासून मोदींसोबत असलेल्या माजी IAS शर्मांची उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी वर्णी

विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच हा निर्णय घेण्यात आलाय

लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आयएएस अधिकारी एके शर्मा यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून माजी आयएएस अधिकारी व विधान परिषद आमदार शर्मा यांचा समावेश उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात केला जाईल असे अंदाज वर्तवण्यात येत होते. 

शर्मा यांच्यावर या वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील करोना परिस्थितीची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आज नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा करताना, एक उपाध्यक्ष व दोन प्रदेश मंत्र्यांची नावे जाहीर केली. यानुसार ए.के शर्मा यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची तर अर्चना मिश्रा व अमित वाल्मिकी यांच्यावर प्रदेश मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

दरम्यान, पक्षातर्फे यापूर्वीच उत्तर प्रदेश भाजप नेतृत्वामध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पक्षांतर्गत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात भाजप आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली व स्वतंत्र देव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लढेल.

अधिकारी म्हणून कार्यरत असताना अरविंद कुमार शर्मा यांनी २००१ पासून २०२० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केलं आहे. ते गुजरात मुख्यमंत्री कार्यालय व त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी निवृत्तीला दोन वर्षे अवधी असतानाच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

शर्मा यांच्या नियुक्तीनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय मनाला जाणारा माजी आयएएस अधिकारी थोपवला जातोय.” असा आरोप केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.