जुन्नर – जुन्नर तालुक्यात 2018-19 च्या खरीप आणि रब्बी हंगामात सर्व पिके मिळून अनुक्रमे 58 हजार व 43 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदाच्या रब्बी हंगामात 10 हजार 700 हेक्टरवर कांदा लागवड झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ती 1700 हेक्टरने कमी झाली. लागवड कमी झाली असली तरी बेड पद्धत आणि ठिबक पद्धतीमुळे 25 टक्क्याने उत्पादन वाढत असून भविष्यात सर्व प्रकारची शेती ठिबक पद्धतीने केल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकते, असे जुन्नर तालुक्याचे कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार पेठेत गुरुवारी (दि. 30 मे) 12 हजर 302 पिशव्यांची आवक झाली असून मागील आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. कांद्याला प्रतवारीनुसार 90 ते 160 रुपये प्रति दहा किलोला दर मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक चेतन रुकारी यांनी सांगितले. एक नंबर कांद्याला 90 ते 160, दोन नंबर कांद्याला 70 ते 90 तर तीन नंबर कांद्याला 50 ते 70 दरम्यान भाव लिलावात मिळाले असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
बाजारात बटाट्याच्या केवळ 5 पिशव्यांची आवक झाली असून दर्जानुसार 40 ते 150 प्रति दहा किलोस तर लसणाला 600 प्रति दहा किलोस भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
नवीन उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी ऐरणी करून चाळीत भराला असून गरजेप्रमाणे शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. ऑगस्टमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे आडतदार सुमित परदेशी
यांनी सांगितले.