अनाथ कुटुंबाला मिळाला पोलिसांचा आधार : सेव्ह फाउंडेशनमुळे मायेची ऊब
लोणी काळभोर – पोलीस खाते म्हणजे निर्दयी, असा समज सर्वसामान्यांचा पोलिसांबद्दल आहे. परंतु लोणी काळभोर पोलिसांनी अनाथ कुटुंबाला मदत करून महिलेला काम देऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला आहे. तिच्या मुलाचे शिक्षण व निवासी व्यवस्था करून खाकी वर्दीतही मदतीसाठी धावणारा माणूस जिवंत असल्याची प्रचिती लोणी काळभोर पोलिसांनी दाखवून दिली आहे.
काही वर्षापासून कर्नाटकातून पती, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असे चौकोनी कुटुंब कदमवाकवस्ती येथे आले. संसार व्यवस्थित सुरू असताना पत्नी व दोन मुलांना वाऱ्यावर सोडून पती परागंदा झाला. त्याचा थांगपत्ता लागला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत मुलांच्या पोटाची खळगी कशी भरायची, हा प्रश्न तिला सतावत होता. तिने जगण्यासाठी धडपड सुरू केली. बिगारी काम करून मुलांचे पालनपोषन करू लागली. परंतू कामातून मिळणारा तुटपुंजा पैसा हा तिच्या मुलांच्या शिक्षणातील अडसर होता. तिने मोलमजुरी करून मुलांचे संगोपन केले. मुलाचे वय 6 वर्षे झाले. आता शिक्षणासाठी तिच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. यातच तिला आशेचा किरण दिसला. आता पोलीस आपल्याला मदत करतील, या भावनेने तिने दोन्ही मुलांना घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यामुळे तिला हुरूप आला. तिने कर्मकहाणी कथन केली. ही महिला मुलांच्या शिक्षणासाठी गयावया करीत आहे हे पाहून बंडगर यांनी कुटुंबाला सर्व मदत करावयाची ठरवले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व पोलीस हवालदार रूपेश भगत यांना यासंदर्भात मदत करावी असे सांगितले. सेव्ह अस फाउंडेशनच्या धनश्री काळे यांनी 6 वर्षाच्या मुलाला बारामती तालुक्यातील एका खासगी वसतिगृहात शिक्षण व निवासाची व्यवस्था केली. त्याचा खर्च संस्था करणार आहे. त्यांच्या आईला एका ठिकाणी काम मिळवून दिले. तिची मुलगी 6 वर्षाची झाल्यानंतर तिच्याही शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे काळे यांनी सांगितले.
अन् अश्रू अनावर
केवळ पोलीस होते म्हणून आपल्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला. व सेव्ह अस फाउंडेशनमुळे उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. सर्व प्रश्नांची उकल केवळ लोणी काळभोर पोलिसांमुळे झाली हे सांगताना त्या मातेच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. तिने पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवलदार रूपेश भगत यांचे हात जोडून आभार मानले.