मुंबई – अभिनेते अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम केलेल्या मुंबई पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलला सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.त्याने 2015 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम केले होते.
तथापि, जेव्हा त्यांची वार्षिक कमाई 1.5 कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी त्याला अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा व्यवस्थेतून काढून टाकले होते. शिंदे यांच्या निलंबनाचे नेमके कारण विचारले असता, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा हवालदार आपल्या वरिष्ठांना न कळवता किमान चार वेळा दुबई आणि सिंगापूरला गेला होता.
सेवा नियमांनुसार, त्यांनी परदेशात जाण्यासाठी वरिष्ठांकडून परवानगी घेणे गरजेचे असतानाही त्याने ती घेतली नव्हती. हा सेवा शर्तीचा भंग आहे त्यामुळे त्याच्यावर निलंबानाची कारवाई करण्यात आली, असे ते म्हणाले. शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने एक सुरक्षा एजन्सीदेखील उघडली आहे जी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवत होती; परंतु शुल्काबाबतचे व्यवहार त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या बॅंक खात्यात दिसून येतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे यांनी बरीच मालमत्ताही खरेदी केली असल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांना ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे ज्या अंतर्गत चार पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतात.