नवी दिल्ली – कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रेचा श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर समारोप झाला. यावेळी हजारो लोक खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत चालत होते. या यात्रेचे ठिकठिकाणी मोठे स्वागत झाले. त्यातून कॉंग्रेसची व राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारली असा निष्कर्ष बहुतेक जणांनी काढला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला होता. 145 दिवसांनंतर श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा औपचारिक समारोप देखील झाला.
दरम्यान, आपली तपश्चर्या पुढे नेण्यासाठी लवकरच काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला याबद्दल ही माहिती दिली.
तसेच, यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना या यात्रेबाबत संकेत दिले होते. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘तपश्चर्या’ पुढे नेण्यासाठी एक कार्यक्रम तयार करण्यास सांगितले. यामध्ये आपल्यासह देशातील प्रत्येकजण सहभागी होण्यास तयार आहे.’ असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले होते.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात लवकरच राहुल गांधी पूर्वेकडून पश्चिमेकडे आपला प्रवास सुरु करणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, राहुल गांधींची ही यात्रा कधी निघणार या बद्दल अद्याप काँग्रेस कडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.