- सांगवी पोलिसांनी घरमालक, एजंट यांना केल्या सूचना
पिंपळे निलख – पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून बहुतांश गुन्ह्यांमध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी परदेशी व्यक्तींना घर भाड्याने देताना काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून पिंपळे निलख व सांगवी परिसरात विदेशी नागरिकांचा विविध गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सांगवी पोलिसांनी स्थानिक घरमालक व रिअल इस्टेट एजंट यांची बैठक घेत त्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या.
सांगवी, पिंपळे गुरव तसेच पिंपळे निलख परिसरामध्ये परदेशी नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु परिसरात व शहरात घडलेल्या गुन्हेगारीमध्ये त्यांचा सहभाग दिसून येत आहे. त्यामध्ये खास करून नायजेरियन नागरिकांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालक व परिसरातील रिअल इस्टेट एजंट यांची सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एकत्र बोलावून त्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.
परिसरातील घरमालकांनी अथवा रिअल इस्टेट एजंट यांनी घर भाड्याने देताना किंवा विक्री करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच काही रुपये मिळतात म्हणून व्यवहार करण्यापेक्षा तो व्यवहार स्वच्छ व काळजीपूर्वक हाताळावा, अशा सूचना या वेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी केल्या.
घर भाड्याने देताना विदेशी नागरिक व खास करून नायजेरियन पुरुष व महिला यांची विशेष काळजी घ्यावी व रीतसर नियम, अटी व रजिस्टर भाडेकरार तसेच पोलीस व्हेरिफिकेशन करून व इतर सूचना देऊन घर भाड्याने द्यावे. सदर व्यक्ती कोणता व्यवसाय करतो तसेच इतर अवैध व्यवसाय किंवा गोष्टींवर लक्ष द्यावे इत्यादी सूचना या वेळी उपस्थित व्यावसायिक यांना देण्यात आल्या. या वेळी सांगवी पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक उपस्थित होते.
प्रलोभनांना बळी पडू नये
बहुतांश घरमालक परदेशी नागरिक जास्तीचे भाडे देतात म्हणून त्यांना आपले घर भाड्याने देतात. त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन किंवा भाडेकरार न करताच त्यांना वास्तव्यास जाग देत आहेत. पैसे वाचविण्यासाठी स्थानिक नागरिक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु अशा कृतीने स्वतः बरोबरच प्रशासनाची दिशाभूल होत आहे. त्यामुळे अधिकचे भाडे मिळते अशा प्रलोभनांना बळी न पडता घरमालक व एजंट यांनी घर भाड्याने देण्यापूर्वी सर्व गोष्टींचा तपास करून घर भाड्याने द्यावे.