बी.1.617 व्हेरियंटमुळे घातक गुणधर्मांमध्ये वाढ
लंडन – ब्रिटनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पूर्वी नियोजन केल्याप्रमाणे 21 जून रोजी निर्बंध हटवणे काही आठवड्यांसाठी लाबणीवर टाकावे, अशी आग्रही मागणी केंब्रिज विद्यापिठातील भारतीय वंशाचे संशोधक प्रा. रवि गुप्ता यांनी केली आहे.
डॉ.गुप्ता हे सरकारच्या “न्यू ऍन्ड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स ऍदव्हायजरी ग्रुप’चे सदस्य आहेत जरी नवीन रुग्ण संख्या तुलनेने कमी असली तरी कोविड-19 मधील बी.1.617 व्हेरियंटमुळे घातक गुणधर्मांमध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.
रविवारी, ब्रिटनमध्ये सलग पाचव्या दिवशी 3,000 पेक्षा जास्त रुग्णंना नव्याने कोविड संसर्ग झाल्याची नोंद झाली. यापूर्वी, 12 एप्रिलपासून ब्रिटनने ही संख्या ओलांडली नव्हती. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 21 जून रोजी निर्बंध हटवण्याची योजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही आठवड्यांसाठी पुढे ढकलावी, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 44,99,939 जणांना करोनाची बाधा झाली आणि 1,28,043 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये यापूर्वीच तिसरी लाट सुरू झाली आहे आणि तीन चतुर्थांश रुग्ण भारतात सर्वप्रथम सापडलेल्या व्हेरियंटचे सापडले आहेत. प्रत्येक लाटेच्या सुरुवातीला रुग्णांची संख्या कमीच असते. मात्र ही संख्या हळूहळू वाढतच जाते. या लाटेच्या सुरुवातीची लक्षणे आता दिसत आहेत.
ब्रिटनमध्ये लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे. म्हणजे ही लाट यायला पूर्वींपेक्षा अधिक काळ लागेल. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची आभासी भावना असू शकते. पण हीच खरी चिंतेची बाब आहे, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.