जुन्नर -जुन्नर तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपलेल्या 26 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (दि. 6) याबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून 16 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती तहसीलदार रविंद्र सबनीस व नायब तहसीलदार सरिता रासकर यांनी दिली.
दरम्यान या 26 ग्रामपंचायतींसोबत वानेवाडी येथे सरपंच आणि सदस्य पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर काले, भिवाडे बुद्रुक, अहिनवेवाडी, खिल्लारवाडी, मढ, हातविज, उंडेखडक, अंजनावळे, माणिकडोह, खानापूर, पिंपळगांव तर्फे नारायणगाव, आंबोली, उच्छिल व सोमतवाडी या 15 गावांमध्ये सदस्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणूका होत आहे. निवडणुका जाहीर झालेल्या गावांमध्ये मंगळवारपासून (दि. 3) आचारसंहिता लागू झाली आहे.
आता उमेदवारांना प्रचारासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे जमविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उमेदवारांना जातीचे दाखले, कर भरल्याच्या पावत्या, शौचालय दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला तसेच स्थावर मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र आदींसाठी लगबग सुरू आहे. दुसरीकडे गावोगावची नेतेमंडळी पारावर बसून उमेदवार शोधाशोध तसेच फोडाफोडी करण्याबाबत खलबते करत आहेत. तर सरपंच पदाचे उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले आहेत.
26 ग्रामपंचायती
सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगांव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगांव, धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण, सुकाळवेढे, पाडळी, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळुंचवाडी, बेल्हे, रानमळा, पिंपरी कावळ, उंब्रज नं. 1, पांगरी तर्फे मढ, तांबेवाडी. जुन्नरला 26 सरपंचपदासाठी निवडणुका जाहीर- प्रचारासाठी केवळ 30 दिवस