नगर – शहरातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आज (बुधवार) रद्द केला. आज काम संपल्यानंतर बॅंकेने कामकाज सुरु करू नये. तसेच बॅंकेवर अवसायकाची नियुक्ती करण्याचे आदेश केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना आणि केंद्रीय सहनिबंधकांना दिले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी हे आदेश काढले आहेत. बॅंकिंग व्यवसायासाठी अर्बन बॅंकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बॅंकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन होत नाही.
बॅंक चालू ठेवणे बॅंकेच्या ठेवीदारांच्या दृष्टीने हितावह नाही. बॅंकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ती सध्याच्या ठेवीदारांना ठेवींच्या पूर्ण रकमा देऊ शकत नाही, तसेच बॅंकेला व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल. बॅंकेचा परवाना रद्द केल्यामुळे बॅंकेला बॅंकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.बॅंकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 95.15 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे, असे पत्रात म्हटले आहे.