पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार असल्याने चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी “शरद पवार’ नावाच्या उमेदवाराने बारामतीमधून अर्ज भरलेला असतानाच आता बारामती लोकसभेच्या रिंंगणात असलेल्या एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्फेट वाद्य “तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे.
या चिन्हास राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चिन्हे आणि त्यांची नावे निश्चित केलेली असून सगळ्या देशासाठी ही चिन्हे आहेत. त्यातच, राष्ट्रवादीच्या चिन्हाचा वाद न्यायालयात सुरू असून न्यायालयाने “तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह पवार यांच्या पक्षाला राखीव ठेवल्याने प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार
‘तुतारी’ नावाला आक्षेप
बारामती लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी सोमवारी चिन्हवाटपाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना “तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले. त्याच वेळी एका अपक्ष उमेदवाराला “ट्रम्पेट’ वाद्य असलेले चिन्ह देण्यात आले आहे.
मात्र, या वाद्याला “तुतारी’ हेच नाव निवडणूक आयोगाच्या यादीत दिले आहे. ही दोन वाद्ये वेगळी असतानाही त्याला एकच नाव असल्याने मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाद्यांचे नाव बदलून द्यावे, अशी तक्रार खाबिया यांनी केली आहे.
“तुतारी ही शिवकालीन आहे तुतारी शब्दसुद्धा हा शिवकालीन आहे. एखाद्या इंग्रजी वाद्याला म्हणजेच ट्रम्पेटला तुतारी आपण कसं म्हणू शकतो ? ट्रम्पेट हा शब्द इंग्रजी असल्याने त्याचा अर्थ हा कर्णा, तुर्हा, तुरा असा होतो. असे असताना आपण सदर शब्दाला तुतारी हे नाव देणे हे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणारे ठरणार आहे.” – लक्ष्मीकांत खाबिया, निवडणूक प्रतिनिधी