बारामती- युवतीची छायाचित्रे स्वतःच्या मोबाइलमध्ये ठेवत तिला अश्लील शिवीगाळ करीत तिच्या अंगावरील ओढणी ओढून काढल्याप्रकरणी एका महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 8) संबंधित महिलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही घटना शनिवारी (दि. 4) घडली.
फिर्यादी युवती बहिणीसह दुचाकीवरून श्रीरामनगरमध्ये खरेदीसाठी निघाली असताना आरोपी तेथे दुचाकीवरून आली. फिर्यादीला थांबवत मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करीत तिच्या अंगावरील ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीची बहिण भांडणे सोडविण्यासाठी आली असताना तिलाही आरोपी महिलेने मारहाण, शिवीगाळ केली. तसेच आरोपी महिलेच्या मोबाइल स्क्रिनवर फिर्यादीला स्वतःचा फोटो दिसला. त्यासंबंधी विचारणा केली असता आरोपीने मोबाइल तिच्याकडे देत, जा तुला काय करायचे आहे करून घे, मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. आरोपी महिलेचा मोबाईल युवतीने पाहिला असता तिने केलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉट आरोपीने काढून ठेवल्याचे तसेच त्या मोबाइलमध्ये अन्य मुलींचे फोटो असल्याचे दिसून आले.