पीटर्सबर्ग, (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केवळ स्वतःचा अहंकार जपत आहेत. स्वतःशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीचा ते विचारही करत नाहीत. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांना करोनाच्या साथीमध्ये सगळ्यांचीच काळजी आहे, असे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मिशीगनमध्ये झालेल्या आपल्या अखेरच्या सभेमध्ये ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
ट्रम्प यांनी गेल्या चार वर्षांत स्वत: शिवाय इतर कोणत्याही देशवासियांना मदत करण्यात रस दाखविला नाही. ट्रम्प केवळ स्वतःचा अहंकार जपत अहेत. ट्रम्प यांनी अध्यक्षपद केवळ रिऍलिटी शो सारखे शोभेचे पद बनवले आणि स्वतःकडेच लक्ष खेचून घेण्याचा उद्योग केला. मात्र देशवासियंना केवळ परिणामच भोगायला लागले हे दुर्दैव असल्याचे ओबामा म्हणाले.
अध्यक्षपदामुळे व्यक्तीमध्ये बदल घडत नाही. उलट तुम्ही कसे आहात, हेच दिसून येते. आठ वर्षांमध्ये मी जे काही मोठे निर्णय घेतले, तेंव्हा ज्यो बिडेन माझ्यासह होते, असे सांगून ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बिडेन यांच्याबरोबरच्या कामाचा दाखलाही दिला.
बिडेन सहृदयी, कष्टाळू आणि कुटुंबाप्रती निष्ठा असलेले गृहस्थ आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सद्गुणांमुळेच ते चांगले अध्यक्ष ठरतील. आम्हाला एक चांगला देश बनवण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व आणि चांगला अनुभवी उमेदवारही मिळाला आहे. बिडेन आणि कमला हॅरिस हे दोघे मिळून एकत्र लढा देतील. ते एकमेकांशी लढणार नाहीत, असा विश्वासही ओबामा यांनी व्यक्त केला.