वॉशिंग्टन – सर्वच प्रकारची प्रदूषणे घातक असतात हे आत्तापर्यंत सिद्ध झालेच आहे. आता हवा प्रदूषणाबाबत एक नवा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे दहा वर्षे लवकर म्हातारपण येते असे समोर आले आहे. हवा प्रदूषणाचा थेट परिणाम श्वासनलिका आणि फुफुसावर होत असल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते. करोना महामारीच्या कालावधीमध्येच याबाबत संशोधन करण्यात आले होते.
तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या लोकांना स्वच्छ हवेच्या वातावरणात राहणाऱ्या लोकांपेक्षा चार दिवस जास्त रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. एकमास्टर युनिव्हर्सिटीने केलेल्या या संशोधनाप्रमाणे केवळ हवेचे प्रदूषणच नव्हे तर डिप्रेशनमुळे सुद्धा लवकर म्हातारपण येऊ शकते. हवा आणि डिप्रेशन यांचा एकत्रित परिणाम झाला तर नागरिक जास्त लवकर म्हातारे होतात असे या अहवालात म्हटले आहे. वायु प्रदूषणामुळे लोकांच्या आजारपणात तब्बल 36 टक्के वाढ होते असेही या अहवालात म्हटले आहे.
हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना डायबेटीस, हृदयविकार, अर्थराइटिस, डोळ्यांची जळजळ असे अनेक विकार जडू शकतात. करोना महामारीच्या कालावधीमध्ये प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 23 टक्के जास्त होते. सयुंक्त राष्ट्रसंघाने काही महिन्यापूर्वी जाहीर केलेल्या एका अहवाला प्रमाणे जगातील दहापैकी नऊ लोक प्रदूषित वातावरणात राहत आहेत वायु प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आजारांमुळे 42 लाख पेक्षा जास्त लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो.