नवी दिल्ली – इम्रान खान यांच्या दोन भगिनी आणि एका भाच्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया पाकिस्तानातील न्यायालयाने सुरू केली आहे. मे महिन्यात इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्यानंतर झालेल्या आंदोलनादरम्यान ऐतिहासिक कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्याप्रकरणी या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे.
“जिना हाऊस’नावाने ओळखल्या जाणाऱ्या कॉर्प्स कमांडर हाऊसवर दिनांक 9 मे रोजी “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून या इमारतीची मोठी तोडफोड केली होती. या संदर्भात इम्रान यांच्या भगिनी आलीमा खान, डॉ. उझमा यांच्यासह भाचा हसन नियाझी आणि “पीटीआय’च्या अन्य 19 जणांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने सुरू केली आहे. आंदोलनातील सहभागाबाबत न्यायालयाच्या सुनावणीला हे सर्वजण सातत्याने अनुपस्थित राहिले आहेत.
या सर्वांनी सुनावणीला उपस्थित रहावे, अशी जाहिरात 16 ऑगस्ट रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतही हे सर्वजण पुढील सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांना फरार घोषित केले जाणार आहे.