मूर्तिकारांची पूर्वतयारी वेगात, पण परिस्थितीबाबत साशंकता
करोना निर्बंधांचा परिणाम
पुणे – करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. आता गणेशोत्सवदेखील अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता मूर्तिकारांकडून पूर्वतयारी वेगात सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, अद्यापही कामगारांची उपलब्धता आणि आगामी काळातील मागणी याबाबत मूर्तिकारांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध याचा परिणाम सलग दोन गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीवर होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यात देखील कच्च्या मालाचा तुटवडा, वातावरणीय बदल, आर्थिक गणिते आदी आव्हाने मूर्तिकारांसमोर होती. मात्र, टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल झाल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.
गणेश मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुमारे एप्रिलपासून सुरू होते. तर आषाढ पौर्णिमेनंतर अंतिम टप्प्यातील रंगकाम सुरू होते. मूर्ती तयार करणे, त्यांचे रंगकाम करणे, अंतिम हात देणे या पद्धतीने प्रक्रिया सुरू असतात.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांनी आता रंगकामाला सुरूवात केली आहे. यंदा मूर्तिकारांनी साधारण 4 फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती करण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय यंदा मूर्तींमध्ये विविध रंगसंगती वापरुन आकर्षक मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
मार्गदर्शक तत्वांनुसार आगामी गणेशोत्सवासाठी 4 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, निर्बंध आणि करोनाच्या धास्तीने पेण येथून कामगार येत नाहीत. त्यामुळे अपुऱ्या कामगार संख्येचे आव्हान आहे. याशिवाय दरवर्षी आम्ही परदेशात गणरायाच्या मूर्ती पाठवतो. पण मागील वर्षी निर्बंधांमुळे मूर्ती पाठवता आल्या नव्हत्या. यंदा या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या “पॅकिंग’ पद्धतीमध्ये देखील बदल झाला आहे. त्यामुळे आता परदेशात मूर्ती पाठवण्याच्या संदर्भात लॉजिस्टीकची विचारणा करून, प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
– राजेंद्र देशमुख, मूर्तिकार