मुंबई – एकनाथ शिंदे यांनी इतर आमदारांसह केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. यानंतर अनेकदा शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये शाब्दिक वाद होताना पाहायला मिळाले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील विरोधकांनी पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले होते. शिंदे आणि ठाकरे गटातील हा वाद आता मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यात देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता ठाण्यात बॅनरवॉर सुरु झालं आहे.
राष्ट्रवादीसह शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ठाण्यात बॅनरवॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यात स्वर्गीय आनंद दिघे यांचं एक वाक्य असलेलं बॅनर लावण्यात आलं होत मात्र ते लगेच हटवण्यात देखील आले.
एका दक्ष नागरिकाने आनंद दिघे यांचं ‘गद्दारांना क्षमा नाही’ हे वाक्य वापरत जोरदार बॅनरबाजी केली आहे. रवींद्र पोखरकर असं या नागरिकाचे नाव असून त्याने लावलेले हे बॅनर रातोरात हटवण्यात आले आहेत. बॅनरवर बंडखोरांना उद्देशून एक कविता देखील करण्यात आली होती. कळवा भागात ही बॅनरबाजी झाल्याचे आढळून आले.
यानंतर बॅनरबाजीला बॅनर उत्तर द्यायला देखील सुरुवात झाल्याचे दिसून येते. नगरसेवक का सोडून चालले आहेत याचा विचार करा असं प्रत्युत्तर देत बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. एकूणच ठाण्यातील या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे.