हैदराबाद -विराट कोहलीचे अफलातून शतक व कर्णधार फाफ डुप्लेसीची वादळी अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर बंगळुरुने या स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुच्या डावाची सुरुवात कर्णधार फाफ डुप्लेसी व विराट कोहली यांनी धडाक्यात केली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना वेगवान अर्धशतकी सलामी दिली. यावेळी डुप्लेसीला एक जीवदान मिळाले. त्याचा पुरेपुर लाभ घेत त्याने अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ कोहलीनेही अर्धशतकी पल्ला पार केला.
या जोडीने 13 व्या षटकांतच केवळ 79 चेंडूत संघाच्या 117 धावा फलकावर लावल्या कोहली व डुप्लेसी यांनी हैदराबादच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही व संघाच्या 15 व्या षटकातच दीडशतकी धावा फलकावर लावल्या. दरम्यान कोहली शतकाच्या जवळही आला होता. त्याने थाटात षटकार फटकावत आपले शतक साकार केले. मात्र, त्यानंतर लगेचच तसाच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने आपल्या 100 धावांच्या खेळीत 63 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 4 षटकार फटकावले. दुसरीकडे डुप्लेसी जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने ग्लेन मॅक्सवेलला साथिला घेत डाव सावरला. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात डुप्लेसी 47 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 71 धावा करुन बाद झाला. यानंतर मॅक्सवेलने मायकल ब्रेसवेलने चमक दाखवताना संघाचा विजय साकार केला. मॅक्सवेल 5 तर ब्रेसवेल 4 धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज हेनरीच क्लासेन याने फटकावलेल्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. बंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मायकल ब्रेसवेलने त्याचा हा निर्णय सार्थ ठरवताना सलामीवीर अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी या दोघांनाही स्वस्तात बाद केले. यावेळी हैदराबादची स्थिती 2 बाद 28 अशी बनली होती. त्यानंतर हेनरीच क्लासेनने कर्णधार एडन मार्करमच्या साथीत डाव सावरताना हैदराबादचे अर्धशतक फलकावर लावले.
क्लासेनने आफलातून फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मार्करमच्या साथीत संघाला शतकी मजलही मारून देताना अर्धशतकी भागीदारी केली. मार्करमने अनावश्यक फटका मारत आपली विकेट बहाल केली. त्याने केवळ 18 धावा केल्या. यावेळी क्लासेनने आपले शतकही साकार केले. त्याने शतक झाल्यावर मात्र, अनावश्यकपणे फटका मारत आपली विकेट गमावली. त्याने आपल्या 104 धावांच्या खेळीत 51 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 6 षटकार अशी आतषबाजी केली. मात्र, त्यापूर्वी त्याने हॅरी ब्रुकच्या साथीत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली होती. क्लासेन परतल्यावर आलेल्या ग्लेन फिलीपने थोडीफार चमक दाखवताना ब्रुकच्या साथीत संघाची धावसंख्या वाढवली. फिलीप बाद झाला तर दुसरीकडे ब्रुक 27 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 19चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. बंगळुरुकडून मायकल ब्रेसवेलने सर्वाधिक 2 गडी बाद केले. महंमद सिराजने 4 षटकांत केवळ 17 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला.
लक्षवेधी
कोहलीची शतकी खेळी
आयपीएलमधील सहावे शतक
ख्रिस गेलशी बरोबरी
डुप्लेसीचेही अर्धशतक
172 धावांची सलामी
डुप्लेसीच्या आयपीएलमधील 1 हजार धावा पूर्ण
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 5 बाद 186 धावा. (अभिषेक शर्मा 11, राहुल त्रिपाठी 15, एडन मार्करम 18, हेनरीच क्लासेन 104, हॅरी ब्रुक नाबाद 27, मायकल ब्रेसवेल 2-13, महंमद सिराज 1-17, हर्षल पटेलने 1-37, शाहबाज अहमद 1-38). रॉयल चॅलेंजर बंगळुरु – 19.2 षटकांत 2 बाद 187 धावा. (विराट कोहली 100, फाफ डुप्लेसी 71, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 5, मायकल ब्रेसवेल नाबाद 4, टी. नटराजन 1-34, भूवनेश्वर कुमार 1-48).