मुंबई – आपल्या विधानांमुळे सतत चर्चेत असणारे योगगुरु बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना who ने ठरवून दिलेल्या अटी न पाळल्यामुळे पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नेपाळने ब्लॅकलिस्ट केले आहे. केवळ याच कंपनीला नाही तर एकूण १६ भारतीय औषध कंपन्यांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
यामुळे आता पतंजली समोर भारताबाहेर व्यापार करण्यासाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. इतर १६ कंपन्या देखील who च्या नियमांचे पालन करू न शकल्याने त्यांना देखील ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचा फटका सहन करावा लागत आहे. नेपाळमधील कंपन्यांना यापूर्वी प्रशासनाने १८ डिसेंबर रोजी याबाबत नोटीस देखील बजावली होती.
यानंतर आता नेपाळ प्रशासनाने औषध कंपन्यांवर कारवाई करत एजंटला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांची औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार डब्लूएचओच्या मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता डब्लूएचओच्या गाईड लाईनचे पालन करणाऱ्या कंपन्याच नेपाळमध्ये व्यवसाय करू शकणार आहेत.