बाणेर…विकासाचा नवा ‘पॅटर्न’!

सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट परिसराच्या विकासाला ठरतेय पूरक

औंध-बाणेर उपनगर वार्तापत्र : अभिराज भडकवाड

गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. विशेषत: उपनगरे आणखी विस्तारत आहेत. यात सर्वांना राहण्यायोग्य आणि सुविधांयुक्‍त परिसर म्हणून बाणेरचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकीकडे विकास होत असताना, दुसऱ्या बाजूला स्मार्ट सिटी योजनेत औंध आणि बाणेरचा समावेश झाल्याने जणु दुधात साखरच पडली आहे. त्यामुळे गावपण टिकवून ठेवत बाणेरची झेप शहरासाठी लक्षवेधी ठरत आहे.

गाव म्हटलं, की तेथे राजकारण असतेच. राजकारणामध्ये एका पक्षाचा दुसरा पक्षाला विरोध. एका पक्षाने काही कामे सुरुवात केली असता, दुसऱ्या पक्ष कुरघोडी करत कामात अडथळे आणतात. या दृष्टचक्रामुळे कित्येक गावांचा विकास खुंटलेला दिसून येतो.

परंतु, या सर्वाला फाटा देत बाणेरमध्ये विकासाचा “बाणेर पॅटर्न’ उदयास येत आहे. बाणेर येथे विकासकामांमध्ये सर्व पक्षातील नेते एकत्र येऊन काम करताना दिसून येत आहेत. कोणतेही राजकीय कुरघोडी न करता गावच्या विकासासाठी परिसरातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन कामे करत आहेत. यामुळेच बाणेर परिसराचा विकास वेगाने होत आहे.

बाणेरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबुराव चांदेरे, तसेच भाजपचे ज्योती गणेश कळमकर व स्वप्नाली प्रल्हाद सायकर असे तीन नगरसेवक आहेत. काही वेळेस या सर्व नगरसेवकांना एकत्र येऊन काम करताना पक्ष बदलाच्या अफवांमुळे त्रास होतो. परंतु या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हे सर्व नगरसेवक एकत्रितपणे विकास कामे करत आहेत. कोणतेही काम करत असताना तीनही नगरसेवक पाठपुरावा करत असल्यामुळे काम जलद गतीने आणि तितकेच दर्जेदार होते. याचेच उदाहरण म्हणजे बिटवाइज कंपनीजवळील “सब-वे’चे झालेले काम.

तसेच नुकतेच बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी देखील सर्व पक्षांतील नेत्यांनी एकत्र येऊन हा समारंभ उत्तम रीतीने पार पाडला. या पॅटर्नची चर्चा सर्वत्र होत असून, याचे कौतुकदेखील होत आहे. सर्व गावांमध्ये अशाच पद्धतीने पॅटर्न राबविण्यात यावा, असे येथील ज्येष्ठ नेते सांगत आहेत.

“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, परंतु विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारे राजकारण आडवे येणार नाही,’ असे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे
बाणेर परिसर स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असल्याने येथे सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. तर, काही पूर्ण झाली आहेत. यात प्रामुख्याने रस्ते सुशोभिकरण, पादचारी मार्गांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. तर, रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. स्मार्ट दवाखाना, स्मार्ट गार्डन उभारण्यात आले आहे. तर, समान पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. येथे विविध आयटी कंपन्या उभारणीचे कामही सुरू असून, येथे भविष्यात आयटी-हब होण्याची अपेक्षा नागरिकांना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.