नवी दिल्ली – अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती.
मी खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यु ट्यूबने देखील समोर येत अशा यु ट्यूब चॅनल्सला ब्लॉक केलंय.”अशी अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.