मुंबई : महाराष्ट्रात अंधश्रध्दा निमूर्लनाचे कार्य निरलसपणे करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या समाज सुधारकाची हत्या करण्याच्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली.
दलवाई पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेने कधीही सनातनला पाठींबा दिलेला नाही. ही संस्था दहशतवादाचा पुरस्कार करते. येवढेच नव्हे तर ही संघटना दहशतवाद पसरवणारी आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी घातली पाहीजे. त्याचबरोबर या संस्थेच्या प्रमुखांना अटक करून त्यांच्याकडे याबाबत तपास केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भीमा-कोरेगाव प्रकरणासंबंधी ताबडतोब चौकशी करावी. संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्याबाबतीत सरकारने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे. भीमा-कोरेगावमध्ये या दोन्ही व्यक्तींचा थेट सहभाग होता. परंतु ते विशिष्ट विचारांचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.