27 कीडनाशकांवर बंदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

45 दिवसांत हरकती नोंदवण्याची सूचना

पुणे – भारतात नोंदणीकृत वा वापरात असलेल्या 27 कीडनाशकांवर (पेस्टीसाइडस) बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. तशी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात 12 कीटकनाशके, 7 तणनाशके व 8 बुरशीनाशके यांचा समावेश आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी आदी सजीवांना असलेले धोके याचा सर्वांगीण अभ्यास करून त्याचा अहवाल केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सीआयबीआरसी) अंतर्गत तज्ज्ञ समितीमार्फत सादर केला आहे. कीडनाशकांचे झालेले फेरमूल्यांकन या आधारांवर ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयावर हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी 45 दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे. त्याचबरोबर परदेशांत या कीडनाशकांवर असलेल्या बंदीची कारणेही अभ्यासण्यात आली आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत 8 जुलै, 2013 मध्ये तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली होती. भारतात नोंदणीकृत असलेल्या निओनिकोटिनॉइड्‌स गटातील कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याबाबत परीक्षण करण्याची जबाबदारी या समितीकडे दिली होती. ऑगस्ट 2013 मध्ये या उद्दिष्टात अजून 66 कीटकनाशकांचे फेरमूल्यांकन करण्याची जबाबदारी वाढवण्यात आली.

परदेशात कायमस्वरूपी किंवा मर्यादित स्वरूपात बंदी असलेल्या मात्र, भारतात ज्या कीडनाशकांची नोंदणी अथवा वापर सुरू आहे अशा कीडनाशकांचे फेरमूल्यांकन याद्वारे करण्यात येणार होते. समितीने या कीडनाशकांचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. त्यानुसार 27 कीडनाशकांचा वापर सुरू न ठेवण्याची शिफारस समितीद्वारे करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×