जामखेडमधून नगर व कर्जतसाठीच धावणार आठ बस

जामखेड -जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लालपरीला परवानगी दिली आहे. जामखेड आगारात आठ बस गाड्यांचे नियोजन केले असून सध्या नगर व कर्जत या शहरासाठी एसटी धावणार आहे. सात ते सायंकाळी सात या वेळेत बससेवा धावणार आहे. दरम्यान जिल्हाबंदी असल्याने एसटी बसचे मार्गही बदलण्यात आले असून प्रवाशाला मास्क आणि हातावर सॅनिटायझर बंधनकारक आहेत. एका आसनावर एकच प्रवासी बसविण्यात आला.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चपासून बससेवा शंभर टक्के बंद होती. त्यातच जामखेड शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने 10 एप्रिल ते 10 मेपर्यत जामखेड शहर हॉटस्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी एसटी पुन्हा धावणार असली तरी ती कडक नियमांसह असणार आहे. जामखेड आगारातून सध्या फक्त जिल्हाअंतर्गत म्हणजे कर्जत व नगर या दोनच मार्गावरच वाहतूक सुरु राहील. जामखेडहून सकाळी आठ वाजता पहिली तर दुसरी बस दुपारी दोन वाजता नगरला सुटणार आहे. नगरहुन जामखेडसाठी बस अकरा वाजता व दुसरी बस पाच वाजता सुटणार आहे. जामखेडहून कर्जतसाठी बस सकाळी आठ वाजता तर दुसरी बस सकाळी अकरा वाजता सुटणार आहे तर कर्जतहून जामखेडसाठी सकाळी साडेनऊ वाजता तर दुसरी बस साडेबारा वाजता सुटणार आहे, अशा आठ गाड्या रस्त्यावर धावणार आहे.

नगरला जाताना बीड जिल्ह्यातील आष्टी मार्गाने जावे लागत होते मात्र जिल्हाबंदी असल्याने नगर जाणारी बस जामखेड – झिक्री – चोंडी- पिंपरखेड – हळगाव- चापडगाव- माहीजळगाव- मिराजगाव- रुई छत्तीशी – नगर तर कर्जतला जाणारी अरणगाव – खडकत ता आष्टी-मार्गे जात होतो येथेही बीड जिल्ह्याची हद्द असल्याने आता बस जामखेड झिक्री – खांडवी – फक्राबाद – पिंपरखेड- चोंडी – चापडगाव – जळकेवडी – कोरेगाव – कर्जत या मार्गने जाणार आहे.

जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत ही सेवा राहील. प्रवासी संख्या वाढल्यास दुसरी बस सोडली जाईल. मात्र यांचा निर्णय विभागीय कार्यालय घेईल. सध्या आठ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. चालक आणि वाहकाकडे सॅनिटायझर देण्यात येणार आहे.
महादेव शिरसाठ आगार प्रमुख जामखेड 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×