पुणे – प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष या बॉलिवूड चित्रपटाबाबत देशभरात वाद सुरू आहे. या चित्रपटाला ठीक ठिकाणी विरोध होत आहे. अनेकांनी चित्रपटाविषयी सोशल मीडियावर लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आदिपुरुषबाबत राजकीय वर्तुळातून देखील संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नुकतंच शिंदे गटाच्या खासदाराने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आदिपुरुष चित्रपटाचे काही भाजप खासदारांनी कौतुक केले असताना आता शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदीची मागणी केल्याचे समजते. बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली असल्याचे समजते. आदिपुरुषमुळे भारताची बदनामी होत असल्याचा दावा यावेळी बारणे यांनी केला आहे.
हा सिनेमा आजच्या पिढीशी सुसंगत आहे असं म्हणत भाजप खासदार रवी किशन यांनी सिनेमाचे चांगलेच कौतुक केले होते. एवढेच काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सिनेमाला रिलीजपूर्वी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे गटाच्या खासदाराने चित्रपटावर बंदीची मागणी केल्याने भाजपची कोंडी होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
देशभरात ठीक ठिकाणी चित्रपटाविरोधात नाराजीचा स्वर असल्याचे पाहायला मिळत आहे. पालघरमधील नालासोपारा येथील मल्टिप्लेक्समध्ये काही हिंदू संघटनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला होता. मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी वाद घालून या संघटनांनी चित्रपट बंद करण्याची मागणी देखील केली होती. केवळ देशातच नाही तर नेपाळमध्ये देखील या चित्रपटामुळे वादंग निर्माण झालेला आहे. काठमांडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.