ईटीपीबीएस प्रणालीमुळे 15 दिवसांचा लागणारा कालावधी वाचणार
पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये सीमेवरील जवानांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सीस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. ई-मेलची प्रिंट काढून जवान मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे. यामुळे पोस्टल सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा 15 दिवसांचा कालावधी वाचणार आहे. जिल्ह्यात 4 हजार 972 सैनिक मतदार या पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
“कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये,’ हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे. पूर्वी अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतर मतपत्रिका छापून ती पोस्टाद्वारे संबंधित सैनिकांपर्यंत पाठविण्यात येत होती. सैनिकांपर्यंत मतपत्रिका पोहोचण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी लागत होता. त्यानंतर मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोस्टाद्वारेच पाठविण्यात येत होती. या पद्धतीनुसार मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होत होता. तसेच, मतदान केल्यानंतर मतपत्रिका वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचणे आवश्यक असते. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ई-मेलच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
असे करता येणार मतदान
निवडणूक आयोगाने ईटीपीबीएस या प्रणाली विकसित केली असून याद्वारे ई-मेलद्वारे मतपत्रिका सैनिकांना पाठविली जाणार आहे. मतपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी मोबाइलवर वन टाईम पासवर्ड दिला जाणार आहे. ही मतपत्रिका डाऊनलोड करून याची प्रिंट काढून त्यावर सैनिकांनी आपले मत नोंदवायचे आहे. मतपत्रिकेवर नोटा हा पर्याय सुध्दा असणार आहे. मतदान केल्यानंतर मतपत्रिका पुन्हा पोस्टाद्वारे संबंधित लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी लागणार आहे. मतमोजणीच्या दिवशी पोस्टल मतदान मोजले जाणार आहे. या मतपत्रिकेवर बारकोड क्रमांक असणार आहे. तसेच, सांकेतिक क्रमांक सुध्दा असणार आहे.