मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा यांची ओळख आहे. चंपासिह थापा यांचे शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
चंपासिंह थापा हे नेपाळचे असून 30 वर्षापूर्वी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते छोटी-मोठी कामे करत असत. मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा हे नाव खूप मोठे होते. त्यानंतर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवक झाले. त्यानंतर के. टी. थापांच्या सोबतीने चंपासिंह थापा मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांचा सेवेकरी बनले होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर थापा यांनी मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक आहे, असे ठामपणे सांगितले होत. पण अचानक ते शिंदे गटात सामिल होणे हे ठाकरे कुटुंबासाठी धक्कादायक मानले जात आहे. चंपासिंह थापा घरात, समारंभात, दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत कायम दिसत असत. त्यांना बाळासाहेबांची सावली म्हटले जात असे.