नवी दिल्ली – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजकीय अंत्यसंस्कार केला जाणार असून त्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला रवाना झाले आहेत. अन्य 20 राष्ट्रप्रमुखांसह तब्बल 100 देशांचे प्रतिनिधीही या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याची माहिती जपानकडून देण्यात आली.
उद्या हे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या 12 ते 16 तासांच्या जपान भेटीबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची पंतप्रधान भेट घेतील व द्विपक्षीय चर्चादेखिल होणार आहे. शिंजो आबे यांच्या पत्नीची भेट घेऊन पंतप्रधान व्यक्तीगत रित्याही शोक व्यक्त करणार आहेत.
“I am traveling to Tokyo tonight to participate in the State Funeral of former PM Shinzo Abe, I will be conveying heartfelt condolences to Prime Minister Kishida and Mrs. Abe on behalf of all Indians,” tweets Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/ZRXDMtmPCL
— ANI (@ANI) September 26, 2022
जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहीलेल्या आबे यांची 8 जुलै रोजी एका प्रचारसभेत एका व्यक्तीने गोळी घालून हत्या केली होती. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि जपानचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते व दोन्ही देशांच्या नेत्यांची म्हणजे मोदी आणि आबे यांची चांगलीच मैत्री होती. भारत आणि जपान राजनैतिक संबंधांना आता 70 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळीही मोदी आणि किशिदा यांना चर्चेची संधी मिळणार आहे.
भारत जपान संबंध एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा या दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असेल. सध्या जपानची भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. तसेच संरक्षण, पायाभूत सुविधा, उर्जा, औद्योगिक विकास, मनुष्यबळ आदी क्षेत्रांत परस्पर सहकार्य केले जाते आहे. बुलेट ट्रेनच्या संदर्भात चर्चा होणार का, असे विचारल्यावर क्वात्रा म्हणाले की द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असल्यामुळे एका विशिष्ट विषयापुरती चर्चा मर्यादीत करणे उचीत ठरणार नाही.