पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत बीडमधील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
सोनवणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शरद पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. अखेर सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोनवणे यांचे स्वागत केले.
सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करतोय. बरेचजण माझा इतिहास शोधताना मी भाजपमधून आलो असं म्हणतील. पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचारांबरोबर मी काम केल, असे सोनवणे यांनी सांगितले.