मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.
सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.
सध्या या चित्रपटाला सिनेरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, थिएटरमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. केवळ पाच कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं आतापर्यत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ‘बाईपण भारी देवा’चे नाव पहिल्या तीनमध्ये आहे. यावरुन या चित्रपटाची लोकप्रियता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता येईल.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे.