वकिलाच्या हत्येचा आरोप : इतर निकाल ठेवले राखून
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांच्यावर ज्येष्ठ वकिलाच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना संरक्षणात्मक जामीन मंजूर केला. यासोबतच खान यांनी इतर आठ प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील वकील अब्दुल रज्जाक शार यांच्या हत्या प्रकरणात खान यांचे नाव सामील होते. 6 जून रोजी अब्दुल शार यांची क्वेट्टा येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर शार यांच्या मुलाने माजी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून वडिलांची हत्या केल्याचा आरोप केला होता.
त्यांनी सांगितले होते की, वकील शार यांनी बलुचिस्तान उच्च न्यायालयात इम्रान खान विरोधात केस दाखल केली होती. त्यानंतर फेडरल सरकार आणि इम्रानच्या पीटीआय पक्षाने एकमेकांवर आरोप केले. दोन्ही बाजूंनी हत्येमागे एकमेकांची भूमिका असल्याचे म्हटले होते.
पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मुख्य न्या. आमेर फारूक व न्या. मियांगुल हसन औरंगजेब यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षणात्मक जामीन मंजूर केला.