पुणे – अवैधपणे वाळू वाहतुक केल्याप्रकरणात डंपर मालकास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. विशेष न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी याबाबत निकाल दिला आहे.
सुनील जालिंदर काळे (रा. देशमुखवाडी, ता. कर्जत, जि. नगर) असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. प्रताप परदेशी, ऍड. सिध्दांत मालेगावकर आणि ऍड. मजहर मुजावर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. 2 सप्टेंबर 2019 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास भिगवन-राशिण रस्त्यावर डिसकळ चौकात डंपर विनापरवाना वाळूची वाहतुक करताना आढळला. पोलिसांनी डंपर भिगवण पोलीस स्टेशनकडे नेण्यास सांगितले.
फिर्यादी गाडीत बसले. त्यावेळी वाळू डंप करून, पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या गाडी अडथळा करून आरोपी पळून गेले. या प्रकरणात काळे याने न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. सिध्दांत मालेगावकर आणि ऍड. मजहर मुजावर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
काळे हा डंपरचे मालक असून, घटनास्थळी हजर नव्हता. त्याने डंपर भाड्याने दिला आहे. गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे दिसून येत नाही. त्याने यापूर्वी कोणताही संघटीत प्रकारचा गुन्हा केलेला नसून, त्याला मोक्का लागू होत नसल्याचा युक्तीवाद ऍड. मालेगावकर आणि ऍड. मुजावर यांनी केला.