सासवड -सासवड नगरपरिषद हद्दीमध्ये करोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने व सलून, ब्युटीपार्लर दुकान बंद ठेवण्यात आली होती. नगरपरिषद हद्दीत एकही रुग्ण नसल्यामुळे इतर सर्व दुकानांसाठी अटी व शर्तींच्या अधीन राहून वेगवेगळ्या दिवशी उघडण्यात आली आहेत.
त्याअनुषंगाने सर्व ब्युटीपार्लरची दुकाने बंद ठेवली होती. परंतु सर्व ब्युटीपार्लरची दुकाने लॉकडाऊन उठेपर्यंत आठवड्यातील फक्त रविवार आणि गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सर्व नियमांचे पालन या दुकानदारांना बंधनकारक आहे.
नियमाचे उल्लंघन केल्यास हे दुकान सील करण्यात येणार आहे. दुकानांमध्ये एकावेळी फक्त पाच ग्राहक सोडण्यात यावे, प्रवेशद्वारावर ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंगची सुविधा आदी नियम आहेत. कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा.
दुकानात रजिस्टरमध्ये ग्राहकांची संपूर्ण माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक आहे. जे नागरिक तोंडाला मास्क लावणार नाहीत. त्यांना 50 रुपये, दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना 500 रुपये व थुंकणाऱ्यांवर 100 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.