बॉलीवूडमधील “बादशाह’ म्हणून अभिनेता शाहरुख खान हा ओळखला जातो. आता “बॅड बॉईज् फॉर लाइफ’च्या दिग्दर्शकांनी त्याला जगातील सर्वात मोठा स्टार असे गौरवोद्गार केले आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहरुख खानला पाहायचे आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक आदिल अल अरबी आणि बिलाल फल्लाह यांनी म्हटले आहे.
1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बॅड बॉईज्’च्या पहिल्या भागात विल स्मिथ आणि मार्टिन लॉरेंस यांनी धम्माल केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर 8 वर्षांनी 2003 मध्ये “बॅड बॉईज्’चा दुसरा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला. पण त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर तब्बल 17 वर्षानंतर “बॅड बॉईज् फॉर लाइफ’ हा तिसरा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला.
हा चित्रपट तिन्ही चित्रपटांमध्ये सर्वाधिक हिट ठरला. यानंतर आणखी एका सिक्वलची घोषणा करण्यात आली. यातील पहिल्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन मायकल बे, तर तिसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिल अल अरबी आणि बिलाल फल्लाह यांनी केले आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत या दोघांनी चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच यासाठी अभिनेता म्हणून शाहरुख खान याची निवड केली. आदिल म्हणाले, बॉलीवूड ही जगातील सर्वात मोठी मूव्ही इंडस्ट्री आहे. शाहरुख खान अजूनही बॉलीवूडमधील सर्वात मोठा स्टार आहे.