बॅकलॉगचे विद्यार्थी संभ्रमात

पुणे -पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची काही विषय राहिले आहेत. त्यांची परीक्षा होणार की नाही, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे बॅकलॉगचे विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. परंतु, जे विद्यार्थी शेवटच्या सत्रात आहेत, पण त्यांचे मागच्या सत्रातील काही विषय राहिले आहेत, त्यांची परीक्षा होणार का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. तथापि, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्णयाचे बहुतांश विद्यार्थी संघटनांने स्वागत केले आहे. मात्र, त्याचा फायदा सर्व सत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच होणार आहे. परंतु, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची काही विषय राहिले आहेत. त्यांच्याबाबत काहीच निश्‍चित धोरण नाही. याबाबत राज्य शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्टता करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

शासनाच्या आदेशानंतर बॅकलॉगचा निर्णय
अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचा बॅकलॉगचा विषय आहे. त्याबाबतच निर्णय राज्य शासनाकडून येणे अपेक्षित आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे आदेश राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त झाले नाही. ते आदेश प्राप्त होताच बॅकलॉगचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या सूत्रांनी दिली.

बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाख
राज्य शासनाने अंतिम सत्र परीक्षा रद्द केले. मात्र, एकूण परीक्षेच्या जवळपास 30 टक्‍के विद्यार्थ्यांचे काही विषय राहिले आहेत. त्याची संख्याही काही हजारांवर आहे. सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अंतिम सत्र रद्द केले. मात्र, बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्याही राज्यभरात सुमारे अडीच लाखांपर्यंत असल्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.