पावसाळी पर्यटन ठिकाणे राहणार “लॉक’

पुणे – पावसाळा सुरू होताच पुणेकरांची पावले आपोआप सिंहगड, लोणावळा, मुळशी या परिसराकडे वळू लागतात. मात्र, यंदा पावसाळी निसर्ग पर्यटनाला करोना विषाणू संसर्गाचा अडथळा निर्माण झाला आहे. या भागातील पर्यटन क्षेत्रे अद्याप तरी पर्यटकांसाठी खुली होण्याची शक्‍यता धुसर आहे. पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आणि वन्यप्राण्यांनाही संसर्गाचा धोका लक्षात घेत, वनक्षेत्रात जाण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्याबाबत वनविभागाकडून अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, मुळशी परिसर, लोणावळा-खंडाळा, भीमाशंकर अभरयारण्य, सिंहगड परिसर या वनक्षेत्राचा भाग आहे. विविध प्रकारच्या प्राणी-पक्षी- वनस्पतींनी सज्ज हा परिसर निसर्गप्रेमींना कायमच भुरळ घालतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी पर्यटनासाठी हौशी पुणेकर उत्साही आहेत. अनेक साहसी तरूण या भागांमधील घनदाट वनक्षेत्रांमध्ये “ट्रेकिंग’चा आनंही लुटतात. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे.पावसाळ्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता, वनविभागाच्या अखत्यारित येणारी ठिकाणे पर्यटनासाठी खुली करण्याबाबत वनविभागाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.