अक्षय कुमारच्या बच्चन पांडे’ची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा आहे. जानेवारीपासून जैसलमेरमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू आहे. निर्मात्यांना हे शहर इतके आवडले की त्यांनी उर्वरित शुटिंगदेखील इथेच करायचे ठरवले आहे. आगोदर केलेल्या नियोजनानुसार सिनेमाचा बॅकड्रॉप उत्तर प्रदेशातील आहे. मात्र जैसलमेरमधील लोकेशन इतके चांगले आहे की उत्तर प्रदेशातले शुटिंगदेखील इथेच करावे, असे निर्मात्यांना वाटले. त्यासाठी जयपूरमधील काही भाग उत्तर प्रदेशाप्रमाणे दाखवण्यात येणार आहे.
त्यानुसार सर्व नियोजन केले जाणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ‘बच्चन पांडे’च्या शुटिंगला सुरुवात झाली आणि पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. “बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमार एका गॅंगस्टरच्या रोलमध्ये दिसणार आहे. मात्र त्याला सिनेमाचा हिरो बनण्याची महत्वाकांक्षा असणार आहे. तर कृती सेनन पत्रकार म्हणून दिसणार आहे.
तिला सिनेमाचे डायरेक्टर बनायचे आहे. “बच्चन पांडे’मध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी देखील महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. कॉमेडीचा तडका असलेल्या “बच्चन पांडे’मध्ये फिल्मी दुनियेतील गमती जमती तर असणार आहेतच. त्याशिवाय अंडरवर्ल्ड आणि सिनेसृष्टीचे संबंधही दर्शवलेले असणार आहेत.