पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन घेताना विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्याची सुविधा देऊ नये, अशी मागणी माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.
महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याचा पर्याय अशैक्षणिक व परीक्षेची गुणवत्ता, विश्वासार्हता संपवणारा निर्णय ठरेल.
बहुपर्यायी प्रश्न काढताना किमान विद्यार्थी संख्येच्या 10 टक्के प्रश्नमंच तयार करावा. ही परीक्षा एका तासाची व 50 गुणांचीच होणार आहे. त्यामुळे या निर्णयाने सर्व अभ्यासक्रमावर परीक्षा घेताना मर्यादा येणार आहेत.
वर्णनात्मक प्रश्नाचे एकूण प्रश्नपत्रिकेतील प्रमाण किमान 50 टक्के असले पाहिजे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.