पुणे – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ
मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी म्हणजेच “पुरंदरे वाड्यात’ सकाळी ८ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरेंवर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले.
त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले असून, यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली गेली. यावेळी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतून पुण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेण्यात पुण्यात दाखल होते.